| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कर्जत या राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ ते कोदीवले भागातील रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल 23 नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करीत कृषीवलने आवाज उठवला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ येथील रेल्वे फाटकापासून निर्माण नगरी रस्त्यापर्यंत आणि पुढे धामोते गावापासून कोदिवले गावापर्यंत असलेल्या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नेरळ-कळंब रस्त्यावरील प्रवास अडखळता बनला आहे. या रस्त्यावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही मागील आठ महिन्यांत झालेली नव्हती. मात्र, माध्यमांनी आवाज उठवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना जाग आली आहे. या रस्त्यावर आता खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना माध्यमांच्या दबावामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरल्याने वाहनचालक आणि प्रवासी रिक्षा चालकांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, नेरळ फाटक ते निर्माण नगरी गेट या भागातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटकरण काम मंजूर आहे. त्यामुळे या रस्त्यावर लवकरच काँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.







