| माथेरान | प्रतिनिधी |
दरवर्षी पावसाळ्यात माथेरानमधील विविध भागांतील पॉईंट्सकडे जाणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा होत असते. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच परिस्थिती पहावयास मिळते. याकामी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी स्वतः विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्यांची पाहणी करून दगड मातीच्या साहाय्याने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची कामे हाती घेतली असून, युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या तरी ब्राईट लँड हॉटेल पासून हारमिटेज बंगल्यापर्यंत हा रस्ता बनविण्यात येत असून, अन्य भागातील रस्त्यांची पावसाळ्यामध्ये कामे पूर्ण होतील असे सांगण्यात येत आहे. अनेकदा पर्यटक इथल्या पॉईंट्सकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून पायपीट करताना दिसतात. खासकरून बहुतांश पर्यटक हे निसर्गाच्या सानिध्यात शीतल हवेतील गारवा अनुभवण्यासाठी आपल्या कुटुंबासह मनमोकळेपणे भटकंती करत असतात अशावेळी त्यांना आरामदायी प्रवास करण्यासाठी रस्ते सुस्थितीत असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यमान नगराध्यक्ष यांनी फिल्डवर कामे करण्यास सुरुवात केली असून, ते स्वतः आपल्या सत्तेतील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जातीने लक्ष देत आहेत.
माथेरान हे संवेदनशील क्षेत्र असल्याने याठिकाणी वनखात्याच्या परवानगी शिवाय रस्त्यांची कामे पूर्ण करता येत नाहीत किंवा त्यांच्या जागेतील दगड सुध्दा उचलता येत नाही त्यामुळे आम्ही अन्य भागातून मुरुमाची माती आणून त्यामध्ये केमिकलचा वापर करून दीर्घकाळ रस्ते टीकावेत यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने हे रस्ते बनविणार आहोत जेणेकरून होणाऱ्या महत्वपूर्ण कामांना कुणीही आडकाठी आणून खोडा घालण्याचा प्रयत्न करणार नाही.
चंद्रकांत चौधरी
नगराध्यक्ष माथेरान नगरपालिका
