ऑल इंडिया पँथर सेनेच्या पाठपुराव्याला यश
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील दहीगाव-आमणोली गावाकडे जाणारा मुख्य पूल 13 मे रोजी कोसळला होता. हा पूल तात्काळ दुरुस्त करण्यात यावा याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेने प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली असून, पंचायत समिती सुधागड-पालीच्या वतीने या पुलाचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डंपरचा अतिरिक्त भार आल्यामुळे 1994-95 मध्ये बांधलेला हा मुख्य पूल कोसळला. हा पूल अनेक गावे, आदिवासी वाड्या, बौद्धवाड्या आणि मुख्य बाजारपेठेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग होता. पूल कोसळल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांचे हाल होत होते व संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर तोडगा काढण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भालेराव आणि सुधागड तालुका सेक्रेटरी नितीन गायकवाड यांनी थेट तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, तात्काळ पर्यायी मार्ग आणि नवीन पुलाचे बांधकाम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा व उपोषणाचा इशारा दिला होता.
थर सेनेच्या या आक्रमक पाठपुराव्याची दखल घेत गट विकास अधिकारी लता मोहिते पंचायत समिती सुधागड-पाली यांनी उपअभियंता बांधकाम विभाग, पेण यांना तातडीने अधिकृत पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, दहीगाव आमणोली गावाकडे जाणाऱ्या कोसळलेल्या पुलाची तात्काळ स्थळ पाहणी करून पर्यायी मार्ग मोकळा करण्यात यावा. संदर्भ पत्राचा विचार करून नागरिकांचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे असे पत्रात म्हटले होते.
