सुदैवाने जीवितहानी टळली
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात एक धक्कादायक अपघाती घटना घडली. बुधवारी (दि.13) रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आमणोली गावाला जोडणारा पूल कोसळला. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरमुळे हा पूल कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुढील गावांच्या प्रवासाचा मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे.
जांभूळपाड्यापासून पुढे आमणोली, दहिगाव, कोलतरे तसेच आदिवासी वाड्यांकडे जाणारा हा मार्ग आहे. कमी वजन क्षमतेचा व छोटा असणारा पूल हा पुढील गावातील नागरिकांच्या प्रवासाकरिता एकमेव व महत्वाचा मार्ग आहे. मात्र आता पाऊस डोक्यावर असताना पूल कोसळल्याने नागरिकांना मोठ्या आवाहनांचा सामना करावा लागणार आहे. काहीच दिवसात विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेज सुरु होतं आहेत आणि अशातच पूल तुटल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होणार आहे.
विशेष म्हणजे हा पूल प्रवाशांकारिता प्रवासासाठी वापरात असताना मात्र उद्योजक, व्यावसायिक या पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड मालवाहतूक वाहनांची सततची अवैधरित्या वाहतूक करीत असतात. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारीवरून सुद्धा अवजड वाहनांची मालवाहतूक ही सतत चालू होती. अखेर पूल कोसळण्याची दुर्घटना घडली असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पो.उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पो.ह. कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.







