जनहितासाठी प्रतिनिधीत्व करणार : चित्रलेखा पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी गुरुवारी (दि.24) दुपारी अलिबागमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे दिला.

चित्रलेखा पाटील यांचे अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे आगमन होताच ‘चिऊताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लाल बावटे की जय, लढेंगे जितेंगे’ अशा घोषणा दिल्या. चित्रलेखा पाटील यांचे यावेळी शेकाप भवनमध्ये औक्षण करण्यात आले. शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, अ‍ॅड. राजन पाटील, अ‍ॅड. निता पाटील, शैला पाटील, साधना पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, प्रमोद ठाकूर, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा तथा अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, अश्‍विनी पाटील, संजना कीर, संदीप शिवलकर, अनिल चोपडा, अक्षय्या नाईक, सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, नागेश कुलकर्णी, राकेश चौलकर, अ‍ॅड. सचिन जोशी, अनिल पाटील, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, खंडाळेचे सरपंच नासिकेत कावजी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे आगमन होताच त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांसह महिलांनी भवनसमोर गर्दी केली होती. चित्रलेखा पाटील यांनी जिल्ह्यात 25 हजार सायकली मुलींना गावोगावी दिल्या आहेत. या सायकलवर बसून अनेक गावे, वाड्यांमधील मुली शाळेत जात आहेत. प्रगती व बदलाचे स्वरुप असलेल्या सायकवर स्वार होऊन चित्रलेखा पाटील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत दाखल झाल्या. गुरुवारी 24 ऑक्टोंबर रोजी सायकल चालवून मोजक्याच शेकापच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीने उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

जनहितासाठी प्रतिनिधीत्व करणार

बदलत्या राजकारणामुळे महिला, तरुण पिढी, गोरगरीब जनता दुर्लक्षित झाले आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघातून भरलेला उमेदवारी अर्ज हा सुशिक्षित, गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, शिक्षणाला प्रगतीवर नेणारा आणि मुली, महिला यांच्यासाठी आशावादी असणारा आहे. भविष्यात जनतेच्या हितासाठी प्रतिनिधीत्व करणार, असा विश्‍वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या, सायकलचे चाक नेहमीच पुढे नेणारे आहे. प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे हे प्रतिक आहे. तोच विचार घेत ग्रामीण भागातील मुलींना सायकली दिल्या आहेत. त्यामुळे सायकलवाली ताई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. हेच विकासाचे चाक घेऊन पुढे जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल, असा विजयाचा आशावाद, विश्‍वास शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला आहे.
Exit mobile version