| चिपळूण | वृत्तसंस्था |
शहराजवळील कापसाळ येथील भीमराज क्रीडा मंडळातर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त (दि.3) ते (दि.5) मे रोजी सारनाथ बुद्धविहार येथे भव्य रिपब्लिकन चषक खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण विभाग एक गाव कापसाळ शाखा 14 संलग्न माता रमाई महिला मंडळांतर्गत भीमराज क्रीडा मंडळ कार्यरत आहे. वाडीतील तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या या मंडळाचे यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्त मंडळामार्फत (दि.6) मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध, महासम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाचे औचित्य साधत या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन (दि.3) मे रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. (दि.4) मे रोजी सायंकाळी दुसर्या सत्रातील सामने, (दि.5) मे रोजी उपांत्य फेरीतील व अंतिम सामने त्यानंतर बक्षीस वितरण होईल. (दि.6) मे रोजी रात्री 10 वाजता प्रसिद्ध कवी गायक विनोद विद्याधर आणि महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कवी गायिका मेघा रतन यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला 12 हजार 125 रुपये, द्वितीय क्रमांकास 10 हजार 25 रु., तृतीय 7 हजार 25, चतुर्थ 5 हजार 25 रु. व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, सवोत्कृष्ट खेळाडू, शिस्तबद्ध संघ यांनाही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. इच्छुक संघांनी (दि.28) एप्रिलपर्यंत रमन मोहिते, प्रथमेश मोहिते, अक्षय सुर्वे, राकेश मोहिते, रूपेश हळदे, सूरज मोहिते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष रमण मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.