| नागपूर | प्रतिनिधी |
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून ‘कमळ’ फुलल्याने महायुतीतर्फे भाजपकडून सलग तिसर्यांदा विद्यमान खासदार, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली. तेव्हापासून महाविकास आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता होती. अनेक नावांच्या चर्चेनंतर नाशिकच्या माजी महापौर, माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची काँगेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकंदरीत लोकसभा रणसंग्रामामुळे माजी मंत्री असलेल्या दोन्ही डॉक्टरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आघाडीकडून धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्याने काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत अनेक नावांच्या चर्चेबाबत गुर्हाळ सुरू होते. त्यात मविप्र शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मालेगावचे माजी महापौर असिफ शेख, संगमनेरचे माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, कुपखेडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील आदींच्या चर्चेनंतर डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी निश्चित झाल्याने काँग्रेस उमेदवाराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मागील तीन निवडणुकांपासून या मतदारसंघावर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसचा गेलेला हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून राजकीय व्यूहरचना सुरू करण्यात आली होती.