। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए प्रस्तावित वाढवण बंदरासाठी जमीन तयार करण्यासाठी ड्रेजिंग करून 200 दशलक्ष क्युबिक मीटर वाळू काढण्यात येणार आहे. चांगल्या प्रतीची वाळू मिळविण्यासाठी अरबी समुद्रात सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आणि दमण किनाऱ्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर सॅण्ड बॉरो पिट (साठा) शोधला असल्याची माहिती जेएनपीएने प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे.
मच्छीमारांचा वाढवण बंदरासाठी प्रचंड विरोध आहे. मच्छीमारांच्या विरोधानंतरही जेएनपीएने प्रस्तावित सुमारे 78 हजार कोटी खर्चाचे वाढवण बंदर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. डहाणू तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या आणि ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी पर्यावरण मंजुरी मिळविण्याचा एक भाग म्हणून मिनिस्ट्री ऑफ इन्व्हारर्मेंट आणि क्लायमेट चेंज (सीसी) आदी विभागाच्या निर्देशानुसार 21 डिसेंबर रोजी दमण येथे सुनावणी घेण्यात आली.
दमण येथे ही जनसुनावणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीने दमण, दादरा आणि नगर हवेलीचे उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. या जनसुनावणीसाठी विविध भागधारक आणि मच्छीमार समुदाय उपस्थित होते. सार्वजनिक सुनावणी दरम्यान संबंधितांनी व्यक्त केलेल्या विविध चिंतांचे निराकरण करण्यात आले. वाढवण बंदराच्या विकासासाठी सर्वसमावेशक पर्यावरण मंजुरीसाठी सार्वजनिक सुनावणीचे कार्यवृत्त मिनिस्ट्री ऑफ इन्व्हारर्मेंटकडे पाठवले जाणार असल्याचे जेएनपीएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.