कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

ईद सणाला पोलिसांची दामत गावात धाड

| नेरळ | वार्ताहर |

दामत गावात कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची गोरक्षकांच्या पाठपुराव्यामुळे सुरक्षित सुटका करण्यात आली. नेरळ पोलिसांनी रात्रीच्या सुमारास दामत गावात धाड टाकून या जनावरांची सुटका केली आहे. दरम्यान, ईदच्या आदल्या दिवशी दामत गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गोवंशीय जनावरांचे प्राण वाचल्याने पोलिसांचे आणि गोरक्षकप्रेमींचे कौतुक होत आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ दामत गावात ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणल्याची माहिती गोरक्ष प्रेमींना मिळाली होती. त्यामुळे गोरक्ष तरुणांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना घेराव घातला. यावेळी पोलीस अधिकारी ढवळे यांना माहिती देत त्या गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका करण्यात यावी म्हणून मागणी लावून धरली होती. अखेर शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस सहकार्‍यांच्या मदतीने ईद सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार 16 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दामत गावात धाड टाकली. यावेळी दहा गोवंशीय जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची सुखरूप सुटका केली आहे. सोमवारी दुसर्‍या दिवशी ईद सणाला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दामत गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Exit mobile version