कत्तलीसाठी नेणार्‍या जनावरांची सुटका

साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दामत या मुस्लिम बहुल गावात 18 जून रोजी कत्तलीसाठी आणण्यात आलेला बैल आणि सोबत गोवंशीय जनावराचे मांस यांची तस्करी नेरळ पोलिसांनी रोखली आहे. पोलिसांनी दामत येथे धाड टाकून आर्टिका गाडीमध्ये कोंबून ठेवलेला बैल आणि सोबत 20 किलो गोवंशीय मांस जप्त केले. या धाडीमध्ये एक अनोळखी इसम पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी ठरला आहे. पोलिसांनी या धाडीमध्ये जिवंत बैल, तसेच गोवंशीय जनावराचे मांस आणि आर्टिका गाडी ताब्यात घेतली असून, दोघांना या तस्करीप्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांच्या पथकाने एमएच – 04, एलएम-1166 या आर्टिका गाडीमध्ये कोंडून ठेवण्यात आलेला बैल तसेच गोवंशीय मांस हस्तगत केले. पोलिसांनी या धाडीमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून, एक अनोळखी व्यक्ती मात्र फरार होण्यात यशस्वी ठरला आहे. मोहमद हुसेन इद्रिस खान, रा. मुंब्रा ठाणे तसेच जमाल जमील अहमद खान, रा. मुंब्रा ठाणे या दोघांसह कत्तलीसाठी बैल नेण्यासाठी आणलेली आर्टिका गाडी असा साधारण साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.

Exit mobile version