| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा पोलीसांनी वेठबिगारीविरोधात धडक कारवाई करत चार अल्पवयीन मुलांची सुटका करून मानवतेचे दर्शन घडविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तोराडी येथील प्रकाश वाघमारे व त्यांच्या पत्नी सुनीता वाघमारे हे आपल्या चार मुलांसह पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. वीटभट्टी मालक नामदेव रानवडे याने वाघमारे दाम्पत्य पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या चार अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने ताब्यात ठेवले होते. मालकाच्या छळाला कंटाळून वाघमारे दाम्पत्य गावी परतले. त्यानंतर दि.4 एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हसळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई करत सुरज (15), राहुल (13), मनोज (11) व अश्विनी (9) या चारही मुलांची सुरक्षित सुटका केली. सुटका केलेल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी वीटभट्टी मालकास ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.







