सुरगडावर अडकलेल्या ज्येष्ठाची सुटका

| पाली | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर रोहा तालुक्यातील वैजनाथ गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर अडकलेल्या अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी त्यांना कड्यावरून सुखरूप खाली उतरविले. संजय साळुंखे (60) हे खांब गावातील रहिवासी असून त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या डाव्या पायाला इजा झाल्याने कमकुवत झाला आहे. आपल्या मूळ गावी खांब इथे साळुंखे आले असता भटकंती करण्यासाठी सुरगडावर गेले होते. गड न्याहाळून परतीचा प्रवास करताना उंच कड्यावरून उतरताना त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी माणगाव तालुक्यातील मित्राशी संपर्क साधला. त्यांच्या मित्राने रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क करून माहिती देताच संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि संजय साळुंखे यांना कड्यावरून सुखरूप उतरवले.

Exit mobile version