अग्निशमन दल धावले मदतीला
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मुसळधार पावसामुळे पाणी साचून शाळेच्या इमारतीत अडकलेल्या एक शिक्षिका आणि दोन परिचारिकांची सुटका करण्याचे काम पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केले आहे. तसेच नवीन पनवेल येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अडकून बंद पडलेल्या बसमधील 15 कर्मचाऱ्यांना पाण्यातून मार्ग दाखवून सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची कामगिरी अग्निशमन दलाच्या जवानांनी पार पडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक होत आहे.
मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. 26) पनवेल पालिका हद्दीतील अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले सखल भागात साचलेल्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरूप पणे बाहेर काढण्याचे काम यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. पनवेल शहरातील साई नगर भागात असलेल्या बावण बंगला परिसरात असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कुलमध्येदेखील पावसाचे पाणी शिरले होते. यावेळी शाळेत उपस्थित एक शिक्षिका आणि दोन परिचारिका शाळेच्या इमारतीत अडकून पडले होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शाळेत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढून घटना स्थळी कोणताच धोका नसल्याची खात्री केली.तर दुसऱ्या घटनेत नवीन पनवेल येथील बांठीया शाळेसमोरील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दीपक फर्टीलायझर कंपनीची बस अडकून बंद पडलेल्या बस मधील 15 कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचे काम अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडले आहे.
पाच ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना
पालिका अग्निशमन दलाच्या अख्त्यारीत येणाऱ्या विभागात 5 ठिकाणी वृक्ष उनमळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्याने घटना स्थळी पोहचत अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांची छाटणी करत रस्ते मोकळे करण्याचे काम केले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.






