| तळा | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांनी पेरणी करताना ती काळजीपूर्वक करावी, असे आवाहन तळा तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कोकणामध्ये मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली असल्याने कोकणातील पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
कोकणामध्ये सर्वसाधारणपणे पारंपरिक पध्दतीने धूळ वाफ्यावर रोहिणी नक्षत्र (27 मे) सुरु झाल्यावर पेरणी केली जाते. यावर्षी पाऊस लवकर सुरु होऊन अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये भात रोपवाटिकेची पेरणी करताना पाण्याचा उत्तम निचरा होणाची जागी करावी. भात रोपवाटीकेची पेरणी केली असल्यास त्यामधून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
निमगरव्या आणि हळव्या जातीची पेरणी जूनच्या पहिल्या आठवडयामध्ये करावी. पावसाने उसंत न घेतल्यास भात बियाण्याची पेरणी रहू काढून करावी. यासाठी भात बियाणे 24 तास पाण्यामध्ये भिजवावे आणि त्यानंतर पाण्यामधून काढून गोणपाटात 24 तास झाकूण ठेवावेत जेणेकरुन त्याला बारीक कोंब येतील त्यानंतर त्याची पेरणी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जागी करावी. नवीन फळबागांची लागवड पुढे ढकलावी तसेच गतवर्षी लागवड केलेल्या फळबागांमधून पाण्याचा निचर होण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्याकडून करण्यात आले आहे.