| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या गिरणे ग्रामपंचायतीतील जल जीवन योजनेत भ्रष्टाचार झाला असून, गिरणे पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळया यादीत टाका त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी गिरणे ग्रामस्थांनी केली होती अन्यथा 29 मे रोजी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
गिरणे ग्रामस्थांच्या उपोषणाला तहसीलदार स्वाती पाटील यांनी गांभीर्याने घेऊन सदर योजनेच्या कामाबाबत तक्रारीच्या अनुषंगाने योजनेचे संबंधित ठेकेदार, सरपंच, ग्रामसेवक, तत्कालीन गिरणे पाणीपुरवठा कमेटी व कार्यालयीन अधिकारी यांच्या मीटिंगचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले आहे.
गिरणे जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम मे.एस.एन. कन्स्ट्रक्शन प्रो. प्रा. अक्षय संजय म्हात्रे, तालुका अलिबाग यांना देण्यात आले होते. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत रुपये 14,34,889 इतकी असून निविदा रक्कम 13.91,124 3.05% कमी दराने इतकी आहे. हे काम जलजीवन मिशन अंतर्गत जुन्या योजनेचे पुनर्जीवन स्वरूपाचे होते यामध्ये विंधन विहीर 3 एचपी इलेक्ट्रिक पंप उध्ववाहिनी, वितरण व्यवस्था इत्यादी कामांचा समावेश होता. निविदेमध्ये समाविष्ट असलेली कामे ठेकेदाराने पूर्ण केलेली असून, योजना 28 नोव्हेंबर 2023 रोजी तत्कालीन पाणी पुरवठा कमेटी, सरपंच यांच्याकडे हस्तांतरित केली असल्याचे कागदोपत्री समजते. या योजनेंदर्भात गिरणे ग्रामस्थ यांनी केलेल्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे.
या मीटिंगसाठी राजिप कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्री. वेंगुर्लेकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी महादेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई, शाखा अभियंता ग्रा.पा.पु. उपविभाग पेण श्री. राठोड, गिरणे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक या कामाचे ठेकेदार मे.एस.एन. कन्स्ट्रक्शन प्रो. प्रा. अक्षय संजय म्हात्रे यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदार स्वाती पाटील यांनी काढले आहेत.