| माथेरान | प्रतिनिधी |
गर्द वनराईने सुप्रसिद्ध असणाऱ्या माथेरान मध्ये पावसाच्या सुरुवातीलाच झाडांची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनापुढे याहीवर्षी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आव्हान उभे राहिले आहे.
चाळीस ते पन्नास फूट उंचीची जुनी वनराई आजही दिमाखात उभी आहे. परंतु, दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात ह्या जुन्या झाडांची पडझड होत असते. विशेष म्हणजे दस्तुरी नाक्यापासून ते रेल्वे स्टेशन भागातील जी रस्त्याच्या कडेला झाडे आहेत ती दिवसेंदिवस पूर्णपणे सुकून चालली आहेत, याबाबत वनखात्याने संशोधन करणे गरजेचे बनले आहे. हीच सुकलेली झाडे उन्हाळ्यात सुध्दा हलक्या वाऱ्याने सुध्दा उन्मळून पडतात. सुदैवाने जीवितहानी होत नसली तरीसुद्धा वादळी वाऱ्यात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
2005 च्या अतिवृष्टीमुळे जंगलातील सुध्दा असंख्य वनराई नष्ट झाली आहे. त्यामुळे त्या त्या भागातील संपूर्ण रान उजाड झाले आहे. माथेरानची खरी ओळख ही याच गर्द झाडीमुळे शाबूत आहे. दरवर्षी पावसाळ्यात विविध शासकीय खात्यांमार्फत वृक्षारोपण केले जाते. परंतु, लावलेली रोपे जगली आहेत की नाही याकडे कुणी ढुंकूनही पहात नाही केवळ एक दिखावा म्हणून हे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून याच माध्यमातून भरमसाठ बिले काढल्याची गावात चर्चा होत असते. निदान यावेळेस वृक्षारोपण कार्यक्रम करताना इथल्या मातीशी एकरूप होणारी पाच ते सहा फुटांची उंच रोपे लावून त्यांचे संवर्धन केल्यासच भविष्यात इथे हरित माथेरान पहावयास मिळू शकते त्यासाठी संबंधित खात्यांची मानसिकता असणे तितकेच महत्त्वाचे आहे.