जलशुद्धीकरण प्रकल्प केवळ नावालाच
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
चार दिवस पडलेल्या पावसानंतर श्रीवर्धन शहरामध्ये नगरपरिषदेकडून गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी नगर परिषदेने जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला. परंतु, जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित होऊन सुद्धा जर का जनतेला दूषित व गढूळ पाणी मिळत असेल तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे, आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीवर्धन शहरातील जलवाहिन्या बदलणे व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मोठ्या धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले होते. अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्रीवर्धन नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याचा वचननामा दिला होता. परंतु, प्रत्यक्षात जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी पंधरा वर्षे लागली.
श्रीवर्धन शहराला रानवली या ठिकाणी असलेल्या पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या पाझर तलावाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. सदर जलशुद्धीकरण प्रकल्प सोलर विद्युत निर्मिती वरती चालवला जातो. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर श्रीवर्धन शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल अशी आशा होती. परंतु, चार दिवस पडलेल्या पावसाने नगर परिषदेकडून गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होणे श्रीवर्धनकरांसाठी अतिशय विचित्र घटना आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प व जलवाहिन्या बदलण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु, एवढा खर्च करून श्रीवर्धन वासियांना जर का दूषित पाणीच मिळणार असेल तर जलशुद्धीकरण प्रकल्प निर्मितीचा काय फायदा? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने श्रीवर्धन वासियांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी जनतेमधून केली जात आहे.