तब्बल दोन तासांनी मार्ग पूर्ववत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचे प्रवाह थेट रेल्वे मार्गावर आल्याने रुळाखालील खडी वाहून जाण्याची घटना नेरळ जवळ घडली. येथील 87/6 या ठिकाणी रुळखालील खडी वाहून गेल्याचे मध्यरात्री 2.00 वाजता येथील गेटमनच्या लक्षात आले. त्यानंतर पहिली दूध लोकल गेल्यानंतर वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. त्यामुळे पहाटेच्या वेळी उपनगरीय लोकलची वाहतूक देखील मंदावली होती. दरम्यान, येथील पुलाखाली गर्डर टाकण्याचे काम अपूर्ण असल्याने परिसरातील दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची घटना घडली.
मध्य रेल्वेवरील नेरळ-कर्जत भागात असलेल्या रेल्वे फाटक 21 या ठिकाणी एक लहान पूल आहे. त्या पुलाखालून माथेरान डोंगरातील पाणी जाण्याचा मार्ग आहे. तसेच, त्या पुलाखालुन अधिक प्रमाणात पाणी वाहून जावे यासाठी मे महिन्यात सिमेंट गर्डर आणण्यात आले आहेत. परंतु, ते गर्डर टाकण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या भागातून वाहणारे पाणी मिळेल त्या भागातून वाहत जाते. परिणामी मंगळवारी सायंकाळ पासून सुरू झालेला पावसामुळे नेरळ आईस फॅक्टरीच्या मागे असलेल्या भागातून पाणी अस्तव्यस्त पसरले. त्यानंतर ते पाणी कालेकर चाळी मधील घरांमध्ये शिरले. हे पाणी मध्यरात्रीच्या सुमारास येथील सहा खोल्यांमध्ये शिरल्याने येथील रहिवाशांची तारांबळ उडाली. त्यानंतर हे पाणी पाडा येथे असलेल्या रेल्वे फाटकातून वाहू लागले. त्यामुळे रेल्वे फाटक काहीकाळ वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढला आणि साधारण दहा मीटर भागातील रुळाखालील खडी वाहून गेली. ही माहिती तातडीने स्थानक प्रबंधकांना देण्यात आली. त्यानंतर लगेचच कर्जत-नेरळ कडे अप-डाऊन करणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, मध्य रेल्वेकडून खडी मागवण्यात आली आणि ती खडी रुळाखाली टाकण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन तासांनी हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी मोठे मनुष्यबळ मध्य रेल्वेकडून तैनात करण्यात आले होते. दरम्यान, या पाण्याने परिसरात असलेली चंचे चाळी मधील तीन घरांना देखील लक्ष्य केले.







