समुद्राकडे जाणारा रस्ता गेला वाहून
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील थेरोंडा गावालाही बसला आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता अक्षरशः वाहून गेला. जवळपास दोन ते तीन फूट माती वाहून गेल्याने या रस्त्याचे रूपांतर ओढ्यात झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोकादायक बनले असून, स्थानिक नागरिकांसह मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. विशेषतः होड्या समुद्रातून बाहेर काढणे व पुन्हा समुद्रात नेणे अत्यंत कठीण झाले असून, त्यांच्या दैनंदिन उपजीविकेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने पाहणी करून हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक कोळी बांधवांनी केली आहे. तसेच संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.







