पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान परिसरातील पेब (विकटगड) किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 12 जणांच्या गटातील एका तरुणाच्या अंगावर दरड कोसळून तो गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. मुसळधार पावसामुळे संपूर्ण ट्रेकिंग पथक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी शिवगर्जना रेस्क्यू टीमच्या मदतीने धाडसी बचावमोहीम राबवत सर्व ट्रेकर्सची सुखरूप सुटका केली.

ठाणे येथील 12 जणांचा ट्रेकिंग गट शनिवारी पेब (विकटगड) किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, माथेरान डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अचानक दरड कोसळली. या दुर्घटनेत ठाणे येथील 31 वर्षीय कौस्तुभ परब यांच्या पाठीवर मोठा दगड पडल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमी अवस्थेत ते किल्ल्यावरच अडकून पडले, तर इतर ट्रेकर्सही प्रतिकूल हवामानामुळे खाली उतरू शकत नव्हते. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीने फणसवाडी आणि आनंदवाडी येथील शिवगर्जना रेस्क्यू टीमला पाचारण केले. पोलीस शिपाई कनके, रेस्क्यू टीमचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मुसळधार पावसात डोंगर चढत घटनास्थळी धाव घेतली.

रेस्क्यू पथकाने जखमी कौस्तुभ परब यांना विशेष काळजी घेत स्ट्रेचरच्या साहाय्याने सुरक्षितपणे किल्ल्यावरून खाली आणले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी डीकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच ट्रेकिंगसाठी आलेल्या इतर सर्व सदस्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला असल्याने नागरिकांनी आणि ट्रेकर्सनी आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच हवामान प्रतिकूल असताना ट्रेकिंग टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version