। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावाच्या समोर उभ्या असलेल्या शिवकालीन विकटगड येथे ट्रेकिंगसाठी आलेले 12 ट्रेकर्स रस्ता सापडला नसल्याने हरवले होते. त्या तरुणांनी पोलीस हेल्पलाईनकडे मदत मागितली असता नेरळ पोलिसांनी पायथ्याशी असलेल्या आनंदवाडीमधील स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने पेब किल्ला येथे अडकलेल्या 12 ट्रेकर्स यांची सुखरूप सुटका केली.
माथेरान डोंगररांगेत असलेल्या पेब किल्ला हा नेरळ गावाच्या पश्चिमेला उभा आहे. या किल्ल्यावर पर्यटक आणि ट्रेकर्स पर्यटन तसेच ट्रेकिंगसाठी जात असतात. 29 ऑक्टोबर रोजी घाटकोपर मुंबई येथील 12 जणांचा ग्रुप नेरळ येथून ट्रेकिंगसाठी रवाना झाला होता. या ग्रुपमध्ये पाच मुलीदेखील होत्या. सध्या किल्ल्यावर गवत वाढले असल्याने पायवाटा अस्पष्ट झाल्या आहेत. ट्रेकिंगसाठी जाताना नेरळ येथून कोणत्याही प्रकारचा गाईड यांची मदत न घेता हे सर्व तरुण किल्ल्यावर पोहचले होते. पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे किल्ल्यावरील नेहमीच्या पायवाटा दिसून येत नव्हत्या. त्यामुळे ते रस्ता चुकले. दुपारी दोनपासून त्या ग्रुपला खाली उतरण्यासाठी रस्ता आढळून येत नव्हता. त्यामुळे रस्ता चुकलेले ट्रेकर्स गवतामुळे भरकटले. साधारण 20 वर्षे वयोगटातील सर्व ट्रेकर्स असल्याने ते सर्व तरुण-तरुणी घाबरले होते. शेवटी त्यांनी साडेचार वाजता पोलीस हेल्पलाईन सोबत संपर्क केला. त्यात संबंधित कॉल पोलीस हेल्पलाईन वरून नेरळ पोलीस यांच्याकडे पोहचला.
पेब किल्ल्यावर कोणी ट्रेकर्स ग्रुप रस्ता भरकटले असल्याची माहिती नेरळ पोलीस यांना मिळताच नेरळ पोलिसांनी तत्काळ पेब किल्ल्याचे पायथ्याचे गाव असलेल्या आनंदवाडी येथे जावून मदत देण्यास सुरुवात केली. या किल्ल्याच्या वाटा आणि किल्ल्याचा परिसर यांची माहिती असलेले तरुण सुरेश निरगुडा, आकाश निरगुडे आणि रवी आगीवळे यांच्या जोडीला पोलीस हवालदार महेश खंडागळे आणि पोलीस शिपाई निरंजन दवणे यांनी आनंदवाडी येथून पाच वाजता किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली. शेवटी किल्ल्यावर पोहचून त्या सर्व 12 तरुणाचा शोध या आदिवासी तरुणांनी घेतला आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजता रस्ता चुकलेले सर्व ट्रेकर्स हे आनंदवाडी येथे सुखरूप पोहोचले. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासमोर त्या सर्व तरुणांना बसवून त्यांचा शोध लागला असल्याची माहिती पोलीस हेल्पलाईन यांना देण्यात आली. सव्वा नऊ वाजता सर्व तरुणांना दोन रिक्षांमधून नेरळ पोलीस ठाणे येथून नेरळ रेल्वे स्थानकात उपनगरीय लोकल पकडण्यासाठी सोडण्यात आले.