। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मासेमारी बंदीचा कालावधी संपताच अनेकांनी मासेमारीसाठी नौका समुद्रात नेल्या. मासेमारीच्या पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले.एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे वेगवान वारा या कचाट्यात सापडलेली नौका सावरत सावरत वरवडे किनार्यावर लागली. सुदैवाने या नौकेवरील 9 खलाशी बालंबाल बचावले.
शासनाने जाहीर केलेल्या मासेमारी बंदीचा कालावधी 31 जुलै रोजी संपला. त्यानंतर ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत.पहिल्या टप्प्यात मासळी चांगली मिळत असल्यामुळे समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांची लगबग असते.रविवारी सकाळी अनेक मच्छीमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या.साखरतर येथील एका मच्छीमाराची नौकाही मासेमारीसाठी होती. सकाळी मासेमारीसाठी बाहेर पडलेली नौका दहा वाव समुद्रात जाळे टाकून होती. खवळलेल्या समुद्रात अचानक नौकेचे इंजिन बंद पडल्याची जाणीव झाली.वेगाने वाहणार्या वार्याबरोबर नौका भरकटू लागली.त्या नौकेवर नऊ खलाशी होते. वारा आणि लाटांबरोबर ही नौका भरकटत वरवडे किनार्यावर येऊन विसावली. सुदैवाने पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना होता होता वाचली.