अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक

शांतीनगर ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत हायवेनाका आयटीआयसमोर भर वस्तीत टॉवरने विळखा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर आजार, व्याधींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी दोन मोबाईल टॉवरमुळे येथील स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना याच ठिकाणी राकेश जैन यांच्या इमारतीवर तिसरा टॉवर उभा राहात असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे.

मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानिकारक असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी येथील स्थानिक प्रभाकर तांडेल, प्रिया तांडेल, मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, विनायक तांडेल, रिशी गुप्ता, शुभम गुप्ता, निशांत पिंगळे, दीपक मेस्त्री, रेणू गुप्ता, पल्लवी खरपुडे आदींसह स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विनापरवाना अनधिकृतपणे सुरु असलेले सदरचे बेकायदेशीर टॉवर तात्काळ हटविण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिला आहे.

Exit mobile version