। सुधागड-पाली । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्षा तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल यांच्या कन्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवस धुमसत आहे. पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी अवघ्या नऊ महिन्यांतच नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचा जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर त्यांनी तो मंजूर केला आहे. या राजीनाम्यामुळे पाली नगरपंचायतीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराची ही पहिली नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान गीता पालरेचा यांना मिळाला होता. मात्र, अवघ्या नऊ महिन्यांत पालरेचा यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष हे पद आता रिक्त झाले असून, अध्यक्षपदाची निवड होईपर्यत अध्यक्षपदाचा कार्यभार उपाध्यक्ष आरिफ मणियार यांनी स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे पाली नगराध्यक्ष पदाचा प्रभारी कार्यभार उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांना देण्यात आला आहे.
पालरेचा यांनी पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने प्रभाग क्रमांक 10 मध्ये लवकरच पोट निवडणूक होणार हे निश्चित झाले असून, त्या निवडणुका कधी होणार आणि नव्याने कोण पाली नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता पालीकरांसह सुधागडवासियांना लागली आहे.
उपनगराध्यक्षांच्या खांद्यावर धुरा
पाली नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नगरपरिषद सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत उपाध्यक्षांनी स्वीकारावयाचा आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्या खांद्यावर नगराध्यक्षपदाची धुरा आली आहे.
राजीनाम्यास कोणतेही कारण नाही. राजीनाम्याआधी काही घडलेले नाही व काही घडणार होते म्हणूनदेखील राजीनामा दिलेला नाही. यापुढेही राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्यात सक्रिय राहणार आहे.
गीता पालरेचा, माजी नगराध्यक्षा