कलमशेत ग्रामस्थ, मुंबई मंडळाचा क्रांतीकारी निर्णय
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील कलमशेत ग्रामस्थ व मुंबई मंडळाने क्रांतिकारी निर्णय घेतला असून, गावची जमीन बाहेरील व्यक्ती व परप्रांतीयांना न विकण्याचा ठराव गाव स्तरावर मंजूर करण्यात आला आहे.
गावकरी व मुंबईकर यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून गावातील काही शेतकरी आपल्या आर्थिक लाभासाठी परप्रांतीयांना जमीन विकत आहेत. त्यामुळे या जमीनवर कपांऊड तयार करुन इतर शेतकरी बांधवांना रस्ता सुद्धा मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थ व परप्रांतीय यांच्यात वाद होत असतात. यामुळे ग्रामस्थांनी एकजूट होऊन परप्रांतीयांना शेतजमिनी न विकण्याचा निर्णय घेतला असून, तसा ठराव करून गावा बाहेरील अगर परप्रांतीयांना व्यक्तीच्या लाभात महसूल तालुका कार्यालयाकडे मौजे कलमशेत येथील खरेदी खत बक्षीस पत्र कोणतेही मालकी हक्क हस्तांतरित होणारे दस्त महसूल दप्तरी नोंदणी करु नये अशा आशयाचे पत्र तळा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे असे निवेदन या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, पोलीस निरीक्षक तळा तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक तळा, तलाठी सजा कार्यालय, मा. सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सोनसडे, यांना रवाना केले आहेत. या कामी मुंबई अध्यक्ष महादेव कुंभेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत वतारे, उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, सेक्रेटरी मंगेश शेंपुडे, उप सेक्रेटरी केशव बाईत, खजिनदार महादेव करण, मंगेश शेंपुडे, तसेच गाव अध्यक्ष जानु अडखळे, उपाध्यक्ष हिराजी खांडेकर, सेक्रेटरी पांडुरंग किंजळे, खजिनदार भागोजी कुंभेकर यांच्या सारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गावातील शेतकरी बांधवाच्या जमीन वाचतील अशी आशा गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत व्यक्त केल्या आहेत. गावातील माहेरवासी महिलांनी देखील यासाठी पुढाकार घेऊन आपल्या वडिलोपार्जित जमिनी वाचवण्यासाठी गावाला सहकार्य करावे असे आवाहन मुंबई कमेटी अध्यक्ष महादेव कुंभेकर यांनी केले आहे.







