करंजाडेत दारूबंदीचा ठराव मंजूर

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी लागू करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, तहसीलदार पनवेल, गटविकास अधिकारी पनवेल यांना देखील त्याची प्रत देण्यात आली आहे.

करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी दारू विक्री होत आहे. त्यामुळे येथील तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन नवजात पिढी व्यसनाधीन होत आहे. तसेच, गावातील दारू विक्रीमुळे बर्‍याचश्या महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रार अर्ज दाखल आहेत. करंजाडे वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्त्याशेजारी वाईन शॉप असल्याने रस्त्यावर ये-जा करणार्‍या महिलांना त्याचा त्रास होत आहे. तसेच, येथे थांबणार्‍या वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अपघात आणि चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहेत. तसेच, वाईन शॉपच्या शंभर मीटरच्या आत एक शाळा आहे. त्यामुळे येथील शाळेतील मुलांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी कृषीवलशी बोलताना करंजाडे ग्रामपंचायतने ग्रामपंचायत हद्दीमध्ये दारूबंदी लागू करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर केला असल्याची माहिती सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे आणि ग्रामविकास अधिकारी सुदिन धनाजी पाटील यांनी दिली आहे.

करंजाडे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच वाईन शॉप आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते आणि महिलांना याचा त्रास होत आहे. संपूर्ण करंजाडेमध्ये दारूबंदी करण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.

मंगेश शेलार,
सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत
Exit mobile version