गोवे ग्रामपंचायतीचे कोलाड पोलिसांना निवेदन
| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्रीबाबत वारंवार सूचना विनंती करूनदेखील ही दारू विक्री बंद होत नसेल तर येत्या 26 जानेवारी रोजी ग्रामस्थ व महिला उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन गोवे ग्रामपंचायतीने कोलाड दिले आहे. याबाबत पोलीस नक्की कोणती भूमिका घेणार हे लवकरच कळणार आहे. यावेळी कोलाड पोलीस अधिकारी अजित साबळे यांना निवेदन देताना गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, ग्रामसेवक गोविंद शिद, नितीन जाधव, संदीप जाधव, लहू पिपळकर, राजेंद्र जाधव, नितीन जवके, श्री. कापसे उपस्थित होते.
अवैधरित्या गावठी, देशी, विदेशी दारू बाळगणे व विक्री करणे कायद्याने सर्वत्र बंदी असताना गोवे, मुठवली गावात राजरोसपणे तिची विक्री होत आहे. यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत चालली आहेत. याबाबत या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने वारंवार सूचना विनंती केली असतानादेखील ही दारू विक्री बंद होत नसेल तर आम्ही ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ महिला 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायतीने कोलाड पोलिसांना दिले आहे.