आदर्श पतसंस्थेचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर

सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड असे नाव

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावात सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड असा बदल करण्याचा ठराव आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 22) पी. एन. पी. नाट्यगृह चेंढरे येथे आयोजित करण्यात आली. आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. या सभेत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावात बदल करून पतसंस्थेचे नाव सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड असे करण्याचा ठराव संचालक ॲड. आत्माराम काटकर यांनी या सभेत मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट करून या ठरावाचे स्वागत केले.

आदर्श पतसंस्थेच्या रायगड जिल्ह्यातील नियोजित माणगाव येथील शाखेसाठी व पुणे – वारजे येथील शाखेसाठी जागा खरेदी करण्याचा ठराव देखील या सभेतच मंजूर करण्यात आला. आदर्शचे 58 हजार 886 सभासद आहेत.रु. 596 कोटी 88 लाख ठेवी आहेत. रु. 460 कोटी 73 लाख रूपये कर्ज आहे. एकत्रीत व्यवसाय रु. 1057 कोटी 61 लाख रूपये आहे. ढोबळ नफा रु. 15 कोटी 41 लाख रूपये झाला आहे. 37 टक्क्यांनी ठेवी वाढल्या आहेत. 45 टक्क्यांनी कर्ज वाढ झाली आहे. आदर्शची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे, अशी माहिती आदर्शचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. मागील एका वर्षात रु. 304 कोटी रुपयांची विक्रमी व्यवसाय वाढ केली, अशी कामगिरी करणारी राज्यातील पहिली संस्था होण्याचा मान आदर्शला मिळाला. सन 2026-27 या आर्थिक वर्षात 1500 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय तर पुढील दोन वर्षात 2500 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करण्याचा मानस आहे, असे आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

Exit mobile version