उपाध्यक्षपदी कैलास जगे यांची बिनविरोध निवड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिजित सुरेश पाटील यांची तर उपाध्यक्षपदी कैलास जयवंत जगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी सोमवारी (दि. 5) सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष पदासाठी अभिजित पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी कैलास जगे यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी माधव भाटकर यांनी जाहीर केले.
यावेळी सुरेश गणपत पाटील, श्रीकांत जुगराज ओसवाल, विलाप मारूती सरतांडेल, अभिजीत सुरेश पाटील, महेश विष्णू चव्हाण, अनंत शामराव म्हात्रे, सतिश दत्तात्रेय प्रधान, सुरेश हरिभाऊ गावंड, कैलास जयवंत जगे, रामभाऊ मारुती गोरीवले , आत्माराम मंगा काटकर, रेश्मा सुशिल पाटील, वर्षा विक्रम शेठ, भगवान नारायण वेटकोळी, जगदिश हरिश्चंद्र पाटील हे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. याप्रसंगी आदर्श भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित पाटील व उपाध्यक्ष कैलास जगे तसेच संचालकांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष कैलास जगे, माजी उपाध्यक्ष सतिश प्रधान, संचालक जगदीश पाटील, संस्थेचे सल्लागार नितीन वाणी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्य अधिकारी उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
संस्थेच्या सक्षमीकरणावर भर द्या. राज्यात 16000 पतसंस्था आहेत. त्यात आदर्श पतसंस्था सक्षमीकरणात पहिल्या दहामध्ये आहे. तिला पहिल्या पाचमध्ये नेण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही संस्थेशी स्पर्धा करू नका.
सुरेश पाटील, संस्थापक अध्यक्ष, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था
अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे मोठी जबाबदारी पडली आहे. ही जबाबदारी समर्थपणे सांभाळेन. संचालकांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करीन. संस्थेच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येईल.
अभिजीत पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था