पेणमधील विद्यार्थ्यांचे दैव बलवत्तर
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील एका खाजगी क्लासेसची सहलीसाठी गेलेली विद्यार्थ्यांची बस तीनशे फूट दरीत कोसळण्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने सर्वांचे दैव बलवत्तर म्हणून या म्हणून जीवितहानी टळली. साठे क्लासेस मधील विद्यार्थी आणि शिक्षक असे एकुण 27 जण बसने लोहगड येथे सहलीसाठी गेले होते. मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथून पर्यटन करुन माघारी परत येताना बस(एमएच 06 एस 9381) विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बस तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचा अपघात झाल्याची बातमी समाज माध्यमातून पेण शहरात पसरताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
विद्यार्थी ने-आण करणार्या स्कूलबसना दूरवर सहली नेण्याचा अथवा प्रवास करण्याची परवानगी उपविभागीय परिवहन खात्याकडून आहे का? नसल्यास या बसवर कारवाई होईल का? अशी विचारणा आता सर्वस्तरातून होत आहे.