राजिप सदस्या पल्लवी प्रसाद भोईर यांचा निर्धार
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याच्या निर्धाराने रायगड जिल्हापरिषद सदस्या पल्लवीताई प्रसाद भोईर यांनी राजिप शाळा चोळे, शिहू, बेणसे व मुंढाणी येथे अचानक भेट देत कडक व सखोल तपासणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य तथा पेण पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोईर उपस्थित होते.
या पाहणीत शाळांतील भौतिक सुविधा, शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या वाचन, लेखन व गणित कौशल्यांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली.यावेळी विश्वास मोकल, भास्कर म्हात्रे, घनश्याम कुथे, सुजित गदमळे, दिपक पाटील, प्रविण कुथे, चंद्रकांत म्हात्रे, हेमंत मोकल, नरेश म्हात्रे, मुजिप आदी मान्यवर उपस्थित होते.
पल्लवी भोईर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा स्मार्ट व डिजिटल करणे हे आमचे उद्दिष्ट असून, त्यासाठी लवकरच ठोस अंमलबजावणी सुरू केली जाईल. त्याअंतर्गत पुढील इनोव्हेटिव्ह उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला. निकृष्ट कामकाजावर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. स्थानिक शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक पाहण्या नियमितपणे सुरू राहणार असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरासारख्या सुविधा देणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
