| खांब | प्रतिनिधी |
धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित सुदर्शन केमिकल कंपनीच्यावतीने रोहा तालुक्यातील चिंचवली येथे 1 हजार झाडे लागवडीचा संकल्प करून तो पुर्णत्वास नेला आहे.
सुदर्शन केमिकल कंपनीचे साईट हेड विवेक गर्ग आणि सी.एस.आर. प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य सामाजिक उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. चिंचवली येथे गेल्या वर्षीही सुदर्शन कंपनीच्यावतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आले होती. परंतु, दुर्दैवाने लागलेल्या वणव्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कोमल वृक्षांची हानी झाली. निसर्गाचे झालेले हे नुकसान पाहून सुदर्शन कंपनीच्या व्यवस्थापनाने हार न मानता, या वर्षी अधिक काळजीपूर्वक 1 हजार वृक्षांची रोपे लावण्याचा आणि ते पूर्णपणे जगवण्याचा एक दृढ आणि संवेदनशील मानस व्यक्त केला आहे. या कार्यक्रमादरम्यान खोपा फाऊंडेशनचे ठिबक सिंचन प्रकल्पाचे कन्सल्टंट प्रवीण थेट यांनी उपस्थितांना तब्बल 160 हून अधिक जंगली वृक्ष व बि-बियाण्यांची सखोल शास्त्रीय माहिती दिली. तसेच, पहिल्या टप्प्यात एकूण 48 प्रकारचे महत्त्वपूर्ण 1 हजार जंगली वृक्षांची लागवड यशस्वीरित्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जंगली झाडे स्थानिक परिसंस्थेला बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच खोपा फाऊंडेशन पुढील 3 वर्षे प्रभावीपणे वृक्षलागवडीवर कार्य करणार आहे, यावर त्यांनी भर दिला.
एक हजार झाडे लागवडीचा संकल्प
