| उरण | प्रतिनिधी |
लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार, दि. 24 जून 2026 रोजी जासई येथील स्मृतीस्थळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी दिबा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या मागणीला अधिक बळ देण्यासाठी आणि दिबा साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी जासई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दि. 24 जून रोजी सकाळी 11 वाजता जासई येथील दिबा पाटील स्मृतीस्थळी अभिवादन कार्यक्रम होणार असून, रायगड, नवी मुंबई, उरण, पनवेल, ठाणे तसेच परिसरातील विविध भागांतील कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि दिबा साहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे हे सकाळी 9 वाजता भिवंडी येथून ठाणे-बेलापूर मार्गे 150 हून अधिक वाहनांच्या ताफ्यासह जासईकडे रवाना होणार आहेत. मार्गातील विविध ठिकाणांहून नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांसह या ताफ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिबा पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी, मच्छीमार, भूमिपुत्र आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या कार्याची आठवण जागविण्यासाठी आणि विमानतळ नामकरणाच्या मागणीसाठी नव्याने संकल्प करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जासई येथे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
दिबा पाटलांच्या नावासाठी 24 जूनला निर्धार सभा
