तुर्भे येथे शेतकरी प्रशिक्षणाला प्रतिसाद

| पोलादपूर | वार्ताहर |

पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द व तुर्भे बुद्रुक येथे कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत असून या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गावांतील एकूण 33 लाभार्थ्यांचे अर्ज प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी 18 युनिट कुक्कुटपालन 15 युनिट दुग्ध व्यवसाय एक पॅक हाऊस 02 गांडूळ खत प्रकल्प व एक मुरघास प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून तुर्भे खुर्द येथील श्रीराम मंदिरामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रशिक्षणासाठी सघन कुक्कुटपालन गट पेण येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्मिता जिंतूरकर यांनी सविस्तर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना कुक्कुटपालनासाठी शेड निर्मितीपासून उत्पादन व त्याचे कीड व रोग व्यवस्थापन तसेच, मार्केटिंग याविषयी माहिती दिली. या मार्गदर्शनादरम्यान कुक्कुटपालनासाठी असणार्‍या योजना याची देखील सविस्तर माहिती दिली. यादरम्यान पोलादपूरचे पशु विकास अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुग्ध व्यवसाय व गाई, म्हैस, शेळी व वराह पालन इत्यादी शेतीपूरक व्यवसायांची विस्तृत माहिती दिली. यावेळी त्यांनी जनावरांना होणार्‍या कीड व रोग व त्याचे उपचार याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमादरम्यान पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी विस्तृत मार्गदर्शन केले व तरुणांनी शेतीकडे वळण्यासंदर्भात विनंती केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलादपूर मंडळ कृषी अधिकारी भरत कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुर्भे कृषी सहायक निवृत्ती बरकडे यांनी केले, तर आभार सुधाकर उत्तेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुर्भे खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद उतेकर यांनी मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version