महावितरणच्या ऑनलाईन वीज भरणाला प्रतिसाद

| मुंबई | प्रतिनिधी |
महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी 11 लाख 53 हजार 703 लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण 2230 कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर 0.25 टक्के सवलत मिळत त्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण 49 लाख 21 हजार 693 ग्राहकांनी 1001 कोटी 12 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर याखालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या 33 लाख 75 हजार 471 ग्राहकांनी 751 कोटी 85 लाख इतका तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या 19 लाख 33 हजार 256 ग्राहकांनी 299 कोटी 15 लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या 9 लाख 23 हजार 283 इतक्या ग्राहकांनी 177 कोटी 96 लाख इतका ऑनलाईन भरणा केला आहे.

वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने वीज बिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचतात. ग्राहक महावितरणच्या मोबाईल प किंवा संकेत स्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहू शकतात. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगदवारे वीजबील भरण्याची सुविधा आहे. ऑनलाइन वीजबील भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. तसेच महावितरणचे मोबाइल प्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले वीज बिल केंव्हाही आणि कोठूनही भरता येते. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Exit mobile version