‘रॉकस्टार’च्या नृत्याविष्काराला भरघोस प्रतिसाद

| पनवेल । वार्ताहर ।
रॉकस्टार डान्स अकॅडमीचा धमाल 2022 डान्स शो पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. रॉकस्टार डान्स अकॅडमी मुलांना नृत्य क्षेत्रात व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अकॅडमीचा वार्षिक डान्स शो मंगळवारी रंगला. या वेळी कलाकारांनी दिलखेच अदाकारी पेश करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरील नृत्य सादर करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला.यामध्ये राकेश बने यांनी शिवरायांची अप्रतिम भूमिका साकारली. यानंतर विविध गीतांवर मुला-मुलींनी नृत्याचे सादरीकरण केले. यामध्ये स्त्री-भ्रूणहत्या रोखून मुली वाचवा हा संदेशही एका नृत्याद्वारे देण्यात आला. यावेळी जयेश चव्हाण, सागर म्हात्रे, रोहन पाटील उपस्थित होते. शोचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले. तीन गटांमध्ये विजेते निवडण्यात आले. यातील मोठ्या गटात लौकिक पाटील प्रथम व नूपुर भोईर द्वितीय, मध्यम गटात आयुष पाटील व शौर्य पाटणे संयुक्तपणे प्रथम व प्रियांश ठाकूर द्वितीय, तर छोट्या गटात वेदा म्हात्रे प्रथम व औक्ष पाटणे याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

Exit mobile version