| रायगड | प्रतिनिधी |
शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना 18 जुनपासुन सुरू करण्यात आली. केवळ 12 दिवसात 4 लाख 3 हजार 294 विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले आहेत.
ही संख्या मागील वर्षाच्या जुन महिन्याच्या तुलनेत सुमारे 83 हजार ने जास्त आहे. तसेच उत्पन्न 26 कोटी रुपयांनी वाढले आहे. विद्यार्थ्यांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला आहे. 15 जुनपासून नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.
त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.