| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मलेशियातील इपोह येथे होणाऱ्या अझलान शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ही स्पर्धा 23 ते 30 नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे. तसेच, संजय याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर भारतीय संघाचे दोन्ही पहिल्या पसंतीचे गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांना विश्रांती देण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी पवन आणि मोहित होन्नेहळी शशिकुमार यांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंग, अनुभवी मधल्या फळीतील खेळाडू मनप्रीत सिंग आणि आघाडीचा खेळाडू मनदीप सिंग या तिघांनाही या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बचावफळीत संजय, जुगराज सिंग आणि अमित रोहिदास हे तीन वरिष्ठ खेळाडू असतील. त्यांच्या जोडीला पूवन्ना चंदूरा बोबी, निलम संजीप ॲक्सेस आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. मधल्या फळीत राजिंदर सिंग, राजकुमार पाल, नीलकंठ शर्मा, रबिचंद्र सिंग मोइरंगथेम, विवेक सागर प्रसाद आणि मोहम्मद रहील मौसिन खेळणार आहेत. आघाडी फळीची जबाबदारी सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा, सेल्वम कार्थी, आदित्य अर्जुन लालगे, दिलप्रीत सिंग आणि अभिषेक यांच्या खांद्यावर असेल.
भारताची सलामीची लढत 23 नोव्हेंबर रोजी कोरियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर बेल्जियम (24 नोव्हेंबर), यजमान मलेशिया (26 नोव्हेंबर), न्यूझीलंड (27 नोव्हेंबर) आणि कॅनडा (29 नोव्हेंबर) यांच्याशी सामने होतील. पहिल्या दोन संघांमध्ये 30 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल. या स्पर्धेत भारताने अखेरचे विजेतेपद 2010 मध्ये मळिवले होते. त्यानंतर 2019 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.







