कामोठेचा पाणी पुरवठा पूर्ववत

। पनवेल । वार्ताहर ।
गेले काही दिवस कामोठे परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने याबाबत शेकापने सिडकोला विचारणा केली होती. तसेच पाणी पुरवठा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या सिडकोने कामोठे परिसरातील पाणी पुरवठ्याबाबतचा प्रश्‍न सोडविला असून तो पूर्ववत होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कामोठे शहराला नवी मुंबई महापालिकेकडून सिडकोमार्फत दैनंदिन सरासरी 35 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. 1 जुलैपासून नवी मुंबई महापालिकेकडून सरासरी 28 एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने कामोठे परिसरावर पाणी संकट ओढावले होते. याबाबत शेकापचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडकोला पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती. तसेच पूर्ववत पाणीपुरवठ्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सिडकोने तात्काळ कार्यवाही केली. तसेच 5 ऑगस्टपर्यंत कामोठे नोडला 35 एमएलडीच्या पुढे पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्‍वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर जगदाळे यांनी अमोल शितोळे यांना दिले आहे.

Exit mobile version