। अलिबाग । वार्ताहर ।
सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतील दाब विमोचकाचे काम पूर्ण झाल्याने हेटवणे पाणीपुरवठा योजनेद्वारे नवी मुंबईला अतिरिक्त 30 एमएलडी पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. यामुळे सिडको अधिकारक्षेत्रातील नोड्सना होणारा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
सिडकोद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार्या नोड्सचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता सिडकोकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सिडकोने 15 दिवसांच्या विक्रमी कालावधीत दाब विमोचकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्याने हेटवणे धरणातून तातडीने अतिरिक्त 30 एमएलडी पाणी साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिडको अधिकार क्षेत्रातील नोडमधील पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने तेथील नागरिकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी पाणी प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने चर्चा सुरू आहेत, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. नवी मुंबईतील सिडको अधिकारक्षेत्रातील खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी, जेएनपीटी बंदर, दिघोडे एमआयडीसी या परिसरास सिडकोकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले विकास प्रकल्प आणि महागृहनिर्माण योजना, यांमुळे दक्षिण नवी मुंबईतील या नोडना वास्तव्यासाठी नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. या नोडमधील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.