25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार

आरोग्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असल्याचं देखील ते म्हणाले.

11 जिल्ह्यात निर्बंध कायम
पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

हे निर्बंध शिथिल
शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचार्‍यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी 50 टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.

Exit mobile version