व्यावसायिकांकडून निर्णयाचे स्वागत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर दोन वर्षांनंतर 100 टक्के निर्बंधमुक्त करण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातील व्यावसायिकांनी ‘कृषीवल’शी बोलताना व्यक्त केली. शिवाय, निर्बंधमुक्तीच्या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले. नव्याने जाहीर करण्यात आलेली नियमावली शुक्रवारपासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार जिल्ह्यांमध्ये सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदी ठिकाणे 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शिथिलता देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांनादेखील पूर्ण क्षमतेनं काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग वा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी आणि शिशू गटांचे वर्गदेखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अ श्रेणीमध्ये येणार्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी 100 टक्के क्षमतेने कामकाज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व स्तरातील व्यावसायिक, नागरिकांच्या प्रतिक्रिया ‘कृषीवल’ने जाणून घेतल्या. सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले असून, उशिरा का होईना, पुन्हा एकदा आपला व्यवसाय नव्या जोमाने बहरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने शासनाने निश्चितच चांगला निर्णय घेतला असून, त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. पर्यटनस्थळ असणार्या अलिबाग शहरात त्यामुळे आता पुन्हा एकदा पर्यटन वाढून ठप्प झालेला व्यवसाय बहरेल. मात्र, नागरिक आणि पर्यटकांना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुनच आपला व्यवसाय तसेच पर्यटनाचा आनंद लुटावा.
प्रशांत नाईक, नगराध्यक्षकोव्हिड काळातील लॉकडाऊन म्हणजे आम्हा सिनेमागृह चालकांचा कसोटी पाहणारा काळ होता. मात्र, आता शासनाने पूर्ण क्षमतेसह सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी दिल्याने आम्हीदेखील तयारीत आहोत. संपूर्ण सिनेमागृहाचे नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत असून, प्रेक्षकांचे स्वागत करण्यााठी आम्ही उत्सुक आहोत. आता प्रेक्षकांनीदेखील चांगला प्रतिसाद देऊन उपस्थिती दाखवावी.
सत्यजित दळी, मालक ब्रह्मा-विष्णू-महेश सिनेमागृह
शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन आम्ही संपूर्ण हॉटेल व्यवसाय चालवित होतो. मात्र, निर्बंधामुळे पर्यटक संख्या रोडावल्याने व्यावसायिकरित्या नुकसान झाले आहे. मात्र, आता नव्याने सर्व निर्बंध हटविल्याने आम्ही समाधान व्यक्त करतो. आता पर्यटकांनीदेखील चांगली हजेरी लावून आस्वाद घ्यावा.
विजय पाटील, पाटील खाणावळस्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जिम, स्विमिंग पूल यातील शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण होऊन सर्वच नव्या जोमाने मैदानात उतरतील. सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजनदेखील होईल.
यतिराज पाटील, क्रीडा प्रशिक्षकलॉकडाऊन काळात सर्वात जास्त सलून व्यावसायिकांचे नुकसान झाले. आतादेखील 50 टक्के क्षमतेने दुकान सुरु असल्याने पूर्वीसारखा धंदा होत नव्हता. आम्ही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत व्यवसाय सुरु ठेवला आहे. मात्र, आता शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने त्याचा निश्चितच लाभ होईल
राजेंद्र पवार, सलून व्यावसायिक