एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका

ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आपल्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्यावतीने मंगळवारपासून संप सुरु करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात या संपाला अल्प प्रतिसाद असला, तरीदेखील संपाचा एसटीला मोठा फटका बसला आहे. एक हजार 998 पैकी 304 कर्मचारी संपात सामील झाले आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल झाले असून 28 लाख रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागला आहे.

राज्याप्रमाणे वेतन मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्यावतीने हा संप सुरु करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी या संपाला प्रतिसाद फारसा मिळाला नाही. मात्र बुधवारपासून या संपाला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. रायगड जिल्हयात आठ एसटी बस आगारापैकी चार आगारातील काही कर्मचारी संपात सामील झाले असून चार आगारातील कर्मचारी संपात सामील झाले नाहीत, अशी माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. एक हजार 998 पैकी 304 कर्मचारी संपात सामील झाले आहेत. या दोन दिवसांच्या कालावधीत 614 फेर्‍या रद्द झाल्यात आहेत. त्यामुळे एसटीला त्याचा फटका बसला असून प्रवाशांनाही त्याचा नाहक त्रास झाला आहे. ही सेवा विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे कोकणात जाणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे.

संपात दीड हजारच्या आसपास कर्मचारी सामील झाले आहेत. परंतु गणेशोत्सवात गावी जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोेजन केले आहे. आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दिपक घोडे
विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ रायगड विभाग
Exit mobile version