सेवानिवृत्त दाम्पत्याला घातला लाखोंचा गंडा

| पनवेल | वार्ताहर |

सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवून खारघर येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त दाम्पत्याची तब्बल 44 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सायबर टोळीने चक्क आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे नाव आणि ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा वापर करून वृद्ध जोडप्याला भीती दाखवून त्यांना ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम पाठवण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. 
 
खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. फसवणूक झालेले 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक खारघरमध्ये राहतात. गेल्या 15 ऑक्टोबर रोजी सायबर टोळीतील एकाने त्यांना संपर्क करून तो डेटा प्रोटेक्शन बोर्डातून शर्मा बोलत असल्याचे सांगितले. तसेच नाशिकमधील काही लोकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी त्यांच्याविरोधात मिळाल्याचे त्यांना सांगितले. याप्रकरणी नाशिक शहरातील रॉडरीक्स नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. तर या सायबर टोळीतील दुसऱ्या आरोपीने पोलीस अधिकारी हेमराज कोहली असल्याचे भासवून या ज्येष्ठ नागरिकाला तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितले. सहकार्य न केल्यास एका तासाच्या आत त्यांना अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी या वयोवृद्ध दाम्पत्याला मोठ्या शिक्षेची भीती दाखवून विश्वासात घेतले. तसेच त्यांनी सहकार्य केले नाही, तर त्यांना 7 वर्षांची शिक्षा किंवा जन्मभर तुरुंगवास होईल, अन्यथा 5 कोटींचा दंड भरावा लागेल, अशी भीती दाखवली. त्यानुसार या ज्येष्ठ नागरिकाने व त्यांच्या पत्नीने सायबर गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे सारस्वत बँक आणि शामराव विठ्ठल को-ऑप. बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे एकूण 44 लाख 91 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने आरोपींच्या खात्यांवर पाठवले. मात्र, या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केल्याचे सांगितले.

Exit mobile version