| अलिबाग | वार्ताहर |
दि.5 व 6 जानेवारी रोजी शेगाव जि.बुलढाणा येथे कोकण एज्युकेशन सोसायटीमधून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा 23 वा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
सन 2000 मध्ये निमंत्रक सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.पी.वालेकर, अ.प्र.देशमुख, पी.जी.कुळकर्णी, स्व.र.ग. पाडगे, स्व.सु.ना. कुळकर्णी, स्व.ना.ना.ठाकूर यांनी स्थापन केलेल्या एच.एम.मेळावा या संघटनेचा मेळावा मलकापूर स्थित माजी मुख्याध्यापक शेषराव सोनुने यांनी निमंत्रित केल्याप्रमाणे सदरचा मेळावा शेगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्यातून पन्नास माजी मुख्याध्यापक सहकुटुंब हजर होते. शेगाव येथील भास्कर सभागृहात यजमान श्री. व सौ.सोनुने यांनी सर्वांचे टोपी, उपरणे व पुस्तक भेटस्वरुप देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मुख्याध्यापक स.रा.मेहेंदळे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ मुख्याध्यापक एस.एम.ठाकूर व बी.पी.म्हात्रे होते. सर्व प्रथम इशस्तवन व स्वागतगीत राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रकाश झांबरे यांनी सुमधुर आवाजात गायले. तद्नंतर निधन पावलेल्या मुख्याध्यापकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेषराव सोनुने यांनी केले. त्यानंतर प्रत्येक उपस्थित मुख्याध्यापकाने आपली व आपल्या कार्याची ओळख करून दिली. यावेळी रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पनवेल अर्बन बँकेचे नवनियुक्त संचालक बी.पी.म्हात्रे, काव्य भूषण पुरस्कार प्राप्त जगन्नाथ जांभळे सर यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहभोजनानंतर विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.शि.जांभळे यांनी, तर आभार प्रदर्शन श्रीकांत पाटील यांनी केले.शेवटी पसायदान मुख्याध्यापिका भारती हळदवणेकर यांनी गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. मेळावा यशस्वी होण्यासाठी शेषराव सोनुने, श्रीकांत पाटील, सुरेश पाटील, उल्हास ठाकूर,अ.प्र.देशमुख,पी.डी.पाटील,बी.पी.म्हात्रे,पी.डी.साठे व मलकापूरचे प्रल्हाद साबे, अनंतराव मारोडे,मनोहर सोनुने व गिरीष काकडे यांनी मेहनत घेतली.