सेवानिवृत्तांचा सत्कार

| खोपोली | प्रतिनिधी |

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राहिलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृह सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत होते. व्यासपीठावर भात विशेषज्ञ डॉ.भरत वाघमोडे, अधिदान व लेखा अधिकारी प्रदीप कदम उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. भगत म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून ऋणनिर्देश करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात येत असून त्यात सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकार्‍यांचे मौलिक योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ. वाघमोडे म्हणाले की, सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार करणे, हा स्तुत्य उपक्रम आहे. संशोधन केंद्राने विकसित व शिफारशीत केलेल्या विविध भात वाणांत मजूर वर्गाचाही वाटा आहे. याप्रसंगी 102 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सेवाकाळात तसेच सेवानिवृत्तीनंतर निधन झालेल्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर.सी. वेटकोळी, किशोर सातकर, दिलीप पाटील, लहू आसोलकर, योगेश आमरे, जितेंद्र कडू, अंगद निर्मळ यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version