बाराव्या डावात गुकेशचा पराभव
। सिंगापूर । वृत्तसंस्था ।
सिंगापूर येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेत्या डिंग लिरेनने बाराव्या डावात गुकेशवर सुरेख विजय मिळवत या लढतीत दिमाखदार पुनरागमन केले आहे. या विजयामुळे पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंचे समान 6 गुण झाले आहेत.
यावेळी बाराव्या डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग पद्धतीने करण्यात आली. डिंगने आपले सर्व मोहरे पटाच्या मध्यभागी आणले होते. या डावात डिंग हळूहळू व्यूहरचना करीत स्वतःची परिस्थिती सुधारत गेला. गुकेशला याविरुद्ध योग्य व्यूहरचना करणे खूपच अवघड गेले. गुकेशच्या हातून हत्तीची आणि घोड्याची चाल चुकीची झाली. डिंगने वजिरासमोरील प्यादे पुढे ढकलण्याची धमकी गुकेशच्या डोक्यावर टांगलेल्या तलवारीसारखी ठेवली होती. याविरुद्ध गुकेशला योग्य उपाययोजना करणे जमलेच नाही. डिंगने वजिरासमोरचे प्यादे अखेरीस पुढे ढकलले आणि डावात सरशी मिळवली.
यात पुन्हा गुकेशने उंटाने घोडा मारण्याची अजून एक चूक केली, जी त्याला खूपच महागात पडली. डिंगने एकापाठोपाठ एक अशी गुकेशची दोन प्यादी खाल्ली व काही खेळ्यांतच डाव खिशात टाकला. यावेळी डिंगने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ खेळला. गेल्या जागतिक अजिंक्यपद लढतीत ज्याप्रमाणे त्याने अकरावा डाव हरल्यावर पुढचा डाव जिंकायची किमया केली होती, तशीच पुन्हा गुकेशविरुद्ध करून दाखविली आहे. एका विश्रांतीच्या दिवसानंतर होणार्या तेराव्या डावात गुकेश पांढरी मोहरी घेऊन जिंकायची पराकाष्ठा करताना दिसेल.
जगज्जेतेपदापासून केवळ 1.5 गुण दूर
लागोपाठच्या सात डावांतील बरोबरीनंतर डी. गुकेशने रविवारी 11व्या फेरीत विजय मिळवत 6-5 अशी आघाडी मिळविली होती. मात्र, लिरेनने 12व्या डावात बाजी मारत पुन्हा बरोबरी साधत आपल्याला गत जगज्जेता का म्हणतात हे दाखवून दिले आहे. जगज्जेते बनण्यासाठी 7.5 गुणांची गरज आहे. म्हणजेच उभय खेळाडू जगज्जेतेपदापासून केवळ 1.5 गुण दूर आहेत. मंगळवारी विश्रांतीचा दिवस असून, बुधवारी व गुरुवारी अखेरच्या दोन लढती रंगणार आहेत.