गतविजेत्या डिंग लिरेनचा विजय
। सिंगापूर । वृत्तसंस्था ।
भारताचा युवा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेण्यात अपयश आले आहे.विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनकडून त्याला हार पत्करावी लागली. त्यामुळे 14 डावांच्या या लढतीत डिंगने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
गेल्या काही काळापासून लय गमावून बसलेला डिंग डावाच्या सुरुवातीला अडखळताना दिसला. त्याने चाली रचण्यासाठी बराच वेळ घेतला. पांढर्या मोहर्यांनी खेळणार्या गुकेशने आक्रमक सुरुवात करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, डावाच्या मध्यात त्याच्याकडून चुकीची चाल रचली गेली. त्यामुळे डिंगचा पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. त्याने आपले मोहरे पटाच्या मध्यावर आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुकेशला चाली रचण्यासाठी आपला वेळ घ्यावा लागला. वेळेचे गणित साधताना त्याच्यावर बरेच दडपण आले आणि 42 चालींअंती त्याने हार पत्करली.
अनपेक्षित सुरुवात
गुकेशने अनपेक्षित पहिली चाल खेळताना आपला राजा पुढे केला. यासह आपले आक्रमक मनसूबे त्याने स्पष्ट केले. याच्या प्रत्युत्तरात डिंगने फ्रेंच बचावपद्धती अवलंबली. गुकेशच्या अनपेक्षित सुरुवातीमुळे डिंगला चाली रचण्यासाठी बराच विचार करावा लागला. पुढील आठ चालींनंतर डिंगकडे अधिक वेळ शिल्लक होता. त्यामुळे सुरुवातीच्या अडचणीतून डिंग बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुकेश वेळेवर नियंत्रण राखण्यात अपयशी ठरला. केवळ दोन सेकंद शिल्लक असताना गुकेशने आपली 40वी चाल खेळली. मात्र, डिंगने तोवर पटावर भक्कम स्थिती मिळवली होती. पुनरागमनाची शक्यता नसल्याने गुकेशने 42व्या चालीअंती हार मानली.