रानफळांच्या विक्रीतून अर्थाजनाचा मार्ग झाला सुकर
। माणगाव । वार्ताहर।
नुकताच हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळी दिवसांत रानावनात होणार्या रान फळांना बहर येण्यास सुरूवात झाली आहे. हिवाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते गुलाबी थंडीचे आणि या थंडीच्या दिवसात खायला मिळणार्या विविध रान फळांचे. नुकतीच थंडीला सुरुवात झाली असून खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमन सुरू झाले आहे.
उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानावनात आंबे, जांभूळ, काजू, इत्यादी रानफळे खावयास मिळतात तसेच खास हिवाळी दिवसातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे, चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी आकर्षणाचा भाग आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार्या थंडीच्या मोसमातील पौष्टिक व आरोग्यवर्धक फळे म्हणून ही फळे प्रसिद्ध आहेत.पावसाळ्यानंतरच्या वाढणार्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर व थंडीच्या मोसमात ही फळे तयार होतात.
आवळा, बोरे, चिंच ही आंबट चवीसाठी प्रसिद्ध असून खास हिवाळ्यात तयार होणारी बोंडे ही तुरट- राकट चवीसाठी प्रसिद्ध आहेत.काटेरी अशा बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्वी होण्यास सुरुवात झाली असून बाजारात पाच ते दहा रुपयांना पुरचुंडीमध्ये ती विकली जात आहेत. कोकणातील रानावणात होणारी ही बोरे खास वाळवून उन्हाळी दिवसांसाठीही ठेवली जातात. खाडी पट्ट्यातील टपोर्या बोरांचे खवय्यांना खास आकर्षण असते. बोरा प्रमाणेच या दिवसात आंबट- चिंबट अशा चिंचांचा मोसम सुरू झाला आहे. चिंचांनी चिंचेची झाडे लगडलेली दिसून येत आहेत. याच दिवसातील चिंचांचा स्वाद घेणे,मिठासोबत खाणे अनेक जण पसंत करतात. पूर्ण परिपक्व झालेल्या चिंचांचा मोसम सुरू होत असून खवय्यांना आंबट चव देणार्या चिंचांची बोंडूके भुरळ घालत आहेत. चिंचेचा कोळ तयार करणे चिंचोके तयार करणे इत्यादी कामे या दिवसात घरोघरी केली जातात. या उद्योगातून अनेक कुटुंबांना अर्थाजनही प्राप्त होत असते. दहा ते पंधरा रुपये वाटा याप्रमाणे या चिंचा विकल्या जात आहेत.
अशा या खास दिवाळी दिवसातील रानफळांची सध्या सर्वत्र चर्चा असून या रानफळांना चांगली मागणी आहे. ही फळे खास क जीवनसत्व देणारी असून थंडीच्या दिवसांत उत्तम आरोग्यासाठी ही फळे खाणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात. जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते. रान फळांना बाजारात विक्रीसाठी चांगली मागणी आहे. वाट्यावर, किलो प्रमाणे हि फळे विकली जातात. यातून अर्थार्जन होत असते.