हजारो हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका
| रायगड | प्रमोद जाधव |
भातकापणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 30 टक्क्यांहून अधिक कापणीची कामे पूर्ण झाली आहेत. भाताची रोपे कापून सुकविण्यासाठी शेतामध्ये ठेवण्यात आली असताना गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसात भिजून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यामध्ये 23 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसात एक हजार 69.92 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 691 गावांमधील पाच हजार 642 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भातशेती संकटात सापडल्याने आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी 86 हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड करण्यात आली आहे. भातपीक चांगल्या पद्धतीने बहरल्याने शेतकरी आनंदी होते. परंतु, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात भातपीक कापणीची कामे सुरू असून, कापणी केलेले भातपीक शेतांमध्ये सुकविण्यासाठी ठेवण्यात आले. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सायंकाळी होणाऱ्या पावसात भातपीक भिजून गेले आहे. भातपीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. रोज सायंकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापणीयोग्य भात वेळेवर कापले नाही, तरी नुकसान आणि कापून ठेवले तरी नुकसान, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. हवामान खात्याने यले अलर्टचा इशारा दिला. त्यानुसार जिल्ह्यात पाऊस कोसळला. या पावसात भातशेती पाण्याखाली गेली आहे. दि. 1 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत पडलेल्या पावसामध्ये एक हजार 698 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यापूर्वीदेखील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेेले. विशेष करून खारेपाटातील भातशेतीला या पावसाचा फटका प्रचंड बसला आहे. 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील रोहा, पोलादपूर, कर्जत या तालुक्यांतील शेतीच्या क्षेत्राचे नुकसान अधिक झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून प्राप्त झाला आहे.
नुकसानीवर दृष्टीक्षेप
| तालुके | बाधित शेतकरी | क्षेत्र (हेक्टरमध्ये) |
| अलिबाग | 117 | 42 |
| पेण | 10 | 3.80 |
| मुरूड | 177 | 47.52 |
| खालापूर | 153 | 33.17 |
| कर्जत | 451 | 171.86 |
| पनवेल | 102 | 29.40 |
| उरण | 47 | 10.70 |
| माणगाव | 234 | 75.79 |
| तळा | 86 | 16.50 |
| रोहा | 2700 | 950 |
| सुधागड पाली | 316 | 125.35 |
| महाड | 163 | 34.80 |
| पोलादपूर | 938 | 127.20 |
| म्हसळा | 94 | 21 |
| श्रीवर्धन | 54 | 9.83 |
| एकूण | 5642 | 1698.92 |
मदतीची प्रतीक्षा
जिल्ह्यात बहुतांशी शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून भातशेती करण्यावर भर देतात. शासनाकडून येणाऱ्या वेगवेगळ्या योजना अनेकवेळा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तरीदेखील शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत आपल्या परीने भातशेतीची लागवड करतात. जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ भातशेतीवर अवलंबून आहे. भातशेतीला चांगल्या पद्धतीने बहर आला होता. परंतु, अवकाळी पावसाने दगा दिला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
कापणीचा हंगाम सुुरू झाला आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरदिवशी नुकसानीचा प्राथमिक अहवाल घेतला जात आहे. 23 दिवसांत झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आदेश काढण्यात आले आहेत.
– वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ओला दुष्काळ जाहीर करा
जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच पावसाने थैमान घातले आहे. भातपीपक बहरून कापणीयोग्य झाले असून, अनेकांनी कापणीला सुरुवात केली. विशेष म्हणजे, खारेपाटात कापणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरु असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भातपिकांची अवस्था दयनीय झाली आहे. शेते पाण्याने भरली आहेत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.






